Translation Panacea

words where to find them

words where to find them

कुठे शोधायचे शब्द?

भाषांतर वगैरे सगळं ठीक आहे हो. पण इतके सगळे शब्द आणायचे कुठूनॽ  शब्दकोशात सापडतील का हे शब्दॽ

 

भाषांतराच्या जगात नव्याने प्रवेश करणाऱ्यांकडून हमखास येणारा प्रश्न आहे हा.

 

किमान दोन भाषांचं ज्ञान असणं ही पहिली अट असते भाषांतरासाठी.   भरपूर शब्दसंपदा असणं हा त्या ज्ञानाचाच एक भाग.   नुसता अर्थ माहीत असून चालत नाही.  विशिष्ट संदर्भानुसार नेमका कुठला शब्द चपखल बसेल ते समजावं लागतं. तो शब्द वेळेला आठवला पाहिजे. त्यासाठी तो माहीत असला पाहिजे..आणि माहीत नसेल तर शोधता आला पाहिजे.  उदाहरणार्थ पाणी, नीर, जल, उदक  या सगळ्याचा अर्थ एकच. पण नळाला उदक आलं असं नाही म्हणत आपण. तिथे पाणीच म्हणावं लागतं. नीरक्षीरविवेक या शब्दातल्या क्षीर चा अर्थ आहे दूध. पण चहामध्ये क्षीर घातलं असं नाही ना म्हणता येत!  शब्दांच्या या छटा समजून घेऊन त्या नेमक्या ठिकाणी वापरता यायला हव्यात. पण मुळात इतके सगळे शब्द माहीतच नसतील तरॽ  मग काय झालंॽ शब्दकोश आहेत की आपल्या दिमतीला. तिथे सापडतात शब्द. खरं आहे. अनेक विषयांवरचे असंख्य शब्दकोश उपलब्ध आहेत आपल्याकडे.  ते निश्चितच खूप उपयोगी ठरतात शब्दसंपदा वाढविण्यासाठी.  पण त्या जोडीला आणखी प्रयत्नही करावे लागतात, किंबहुना केले पाहिजेत.  वाचन हा त्या प्रयत्नांचाच एक भाग. जे आणि जितकं जमेल तितकं वाचत राहिलं पाहिजे.  त्यामुळे शब्दसंपदेत भर तर पडतेच, पण अनेक नवनवीन विषय समजतात. आणि भाषांतराचं जग असं आहे की तिथे कधी कुठल्या विषयावरचं लेखन भाषांतरासाठी समोर येईल ते सांगता येत नाही.  त्यामुळे असंख्य विषयांचं ज्ञान वाढविण्यासाठी वाचन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. आपलं शब्दवैभव वाढतं ते वेगळंच.

 

गप्पा मारा आणि नवे शब्द जाणून घ्या असं म्हटलं तर खरं वाटेल का कोणालाॽ पण हे खरंच आहे. समाजात वावरताना असंख्य प्रकारची, वेगवेगळ्या वयोगटातली, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आपल्या संपर्कात येत असतात.  त्यांच्याशी त्यांच्या विषयाबद्दल बोलणं हा एक आनंदाचा भाग ठरू शकतो.  अर्थात, बोलायचं म्हणजे त्यांना बोलतं करायचं आणि आपण फक्त श्रवणभक्ती करायची.  त्या संवादातून नवेनवे विषय तर समजतातच, पण त्या अनुषंगाने नवे शब्द कानावर पडतात ते वेगळेच. एखाद्या खेडूत आजीकडून चुल्हाणं, फुंकणी वगैरे अगदी गावाकडचे शब्द समजतात आणि कुणा कॉलेजकन्येकडून  हिंग्लिश, मिंग्लिश भाषेतले नवनवे शब्द ऐकता येतात. 

 

थोडक्यात म्हणजे, कानावर पडेल ते ऐकायचं, वाचायला मिळेल ते वाचायचं आणि त्या सगळ्यांतून ग्रहण केलेलं ज्ञान मेंदूच्या एका कप्प्यात साठवून ठेवायचं. प्रथमदर्शनी  जरा अवघड वाटेल हे पण एकदा सवय लागली की सगळंच खूप मनोरंजक होऊन जातं.. इतरांचं गाणं ऐकणं हासुद्धा जसा गायकासाठी एक रियाजाचा भाग असतो तसंच आहे हे.. भाषांतराच्या जगात ज्यांना वावरायचं आहे त्यांनी आवर्जून करावा असा एक मनोरंजक रियाज.

Leave a Reply

Close Menu